सोलापुरात गुंठेवारी शिबिराची पाहणी; नागरिकांना एकाच ठिकाणी मालमत्ता नोंदणी सुविधा
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांसाठी आयोजित गुंठेवारी शिबिराच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांनी नीलम नगर, एमआयडीसी येथील नेताजी सभागृह येथे भेट देत शिबिराची सविस्तर पाहणी केली. या विशेष शिबिरामध्ये प्रभागातील नागरिकांच्या मालमत्तेसंदर्भातील प्रलंबित बाबी मार्गी लावण्यासाठी हद्दवाढ, मोजणी तसेच नोटरीद्वारे झालेल्या खरेदी व्यवहारांची नोंदणी (RTSR) करण्याची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. नागरिकांना विविध कार्यालयांत फेरफटका मारावा लागू नये, यासाठी प्रशासनाने सर्व संबंधित विभागांचा समन्वय साधत हे शिबिर आयोजित केले आहे. महापौरांनी शिबिरातील सुविधा, कागदपत्र पडताळणी प्रक्रिया यांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना कामकाज पारदर्शक, जलद आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्याच्या सूचना दिल्या. कोणत्याही नागरिकाला अडचण येऊ नये आणि प्रत्येक अर्जदाराला योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
यावेळी बोलताना महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की, “या उपक्रमामुळे नागरिकांना त्यांच्या हक्काचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून
मालमत्तेसंबंधित प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागतील. तसेच या प्रक्रियेमुळे सोलापूर
महानगरपालिकेच्या उत्पन्नातही वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या शिबिराचा
मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा.” या प्रसंगी नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूलचे
मुख्याध्यापक रविशंकर कुंभार यांच्या हस्ते महापौरांचा सत्कार करण्यात आला.
नगरसेवक सिद्धेश्वर कमटम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला उपाभियंता नीलकंठ मठपती, सहाय्यक अभियंता आनंद जोशी, शकील शेख, महेश क्षीरसागर तसेच गौरीशंकर आळंगे, विश्वराध्य
मठपती, राम मगर, शिवा कोळी, व्यंकटेश वाशी, श्रीनिवास बुटा, शुभम जिल्हा, मलू अष्टगे, बुधाराम,
इर्शाद जरतार, दिपाली मेटकरी, रेखा चिंतलवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.