मराठवाड्यात भूकंपाचे धक्के; वसमत तालुक्यात केंद्रबिंदू, नांदेड-परभणीतही जाणवले कंप
लातुर : मराठवाडा
परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
निर्माण झाले आहे. आज सकाळी 8 वाजून 47 मिनिटांनी हिंगोली जिल्ह्यात भूकंप झाला.
या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.7 इतकी नोंदवली गेली आहे. अचानक बसलेल्या या
धक्क्यामुळे नागरिक काही काळ घराबाहेर पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
भूकंप हिंगोली जिल्ह्यातील औंढानागनाथ परिसरात झाल्याची
माहिती सर्वप्रथम समोर आली. मात्र, वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे गावाजवळ
भूकंपाचे मुख्य केंद्र असल्याचे प्राथमिक निष्कर्षातून स्पष्ट झाले आहे. या भागात
काही सेकंद जमीन हलल्याची जाणीव नागरिकांना झाली. या भूकंपाची नोंद लातूर येथील
भूकंप मापन केंद्रावर करण्यात आली आहे. मराठवाड्यातील भूकंपीय हालचालींवर लक्ष
ठेवणाऱ्या यंत्रणांनी तात्काळ या घटनेची माहिती संकलित केली. अधिकृत आकडेवारीनुसार,
भूकंपाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असली तरी काही ठिकाणी कंप
स्पष्टपणे जाणवले. हिंगोलीसह नांदेड आणि परभणी जिल्ह्यांमध्येही या भूकंपाचे धक्के
जाणवले. अनेक नागरिकांनी घरातील वस्तू हलल्याचे सांगितले. काही ठिकाणी लोक घाबरून
घराबाहेर धावले, मात्र सुदैवाने आतापर्यंत कोणतीही मोठी
जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती नाही.