दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडेची ऐतिहासिक कामगिरी; 29 किमी ‘पाल्क सामुद्रधुनी’ पार

नागपूर : जिद्द, चिकाटी आणि अथक मेहनतीच्या जोरावर १७ वर्षीय दृष्टिहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अभूतपूर्व कामगिरी करत ‘पाल्क सामुद्रधुनीपार केली आहे. हा पराक्रम करणारी ती जगातील पहिली पूर्णपणे दृष्टिहीन जलतरणपटू ठरली आहे. ईश्वरीने ६ एप्रिल २०२६ रोजी तलाईमन्नार जवळील उरमालाई पॉईंट येथून पहाटे ४ वाजता जलतरणास सुरुवात केली. तब्बल ११ तास १५ मिनिटांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी ३:१५ वाजता ती धनुष्कोडी येथील अरिचलमुनई येथे पोहोचली. या दरम्यान तिने सुमारे २९ किलोमीटरचा समुद्री प्रवास पूर्ण केला. समुद्रातील जोरदार प्रवाह, बदलत्या लाटा आणि जेलीफिशचा धोका अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ईश्वरीने अपूर्व धैर्य आणि मानसिक कणखरता दाखवली. जन्मतः दृष्टिहीन असतानाही तिने सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर खुल्या पाण्यातील जलतरणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या मोहिमेचे आयोजन थेनी येथील ‘ओपन वॉटर स्विमिंग ॲकॅडमी’तर्फे करण्यात आले होते. मोहिमेदरम्यान सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तसेच पॅरा स्विमिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि तमिळनाडू राज्यातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या विक्रमाची नोंद घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक संजय बाटवे यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरीने हा पराक्रम गाठला. तिच्या या यशामागे तिचे आई-वडील कमलेश आणि अरुणा पांडे यांचेही मोठे योगदान आहे.

ईश्वरीची ही कामगिरी केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून, ती संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. “अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी जिद्दीसमोर त्या लहान ठरतात,” हे ईश्वरीने आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.