‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट एसटी बससेवा सुरू; आधुनिक सुविधांसह प्रवास अधिक आरामदायी
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC) ‘शिवशाही’ आणि ‘शिवनेरी’ बससेवेनंतर आता ‘राजमाता जिजाऊ’ या नव्या
अत्याधुनिक बससेवेची सुरुवात करण्यात येणार आहे. या सेवेचे लोकार्पण मंगळवारी,
२४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधिमंडळ
प्रांगणात होणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नागपूरमध्ये पहिली सेवा
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी फेब्रुवारी महिन्यात
या बससेवेची घोषणा केली होती. लोकार्पणानंतर या बससेवेला अधिकृत सुरुवात होणार
असून, पहिल्या टप्प्यात नागपूर शहरात ५० बस सुरू करण्यात येणार आहेत. त्यानंतर
ही सेवा मुंबई, पुणे, नाशिकसह
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये विस्तारली जाणार आहे. तसेच, भविष्यात
एसटीच्या ताफ्यात सुमारे ३,००० ‘राजमाता जिजाऊ’ बस दाखल करण्याचे नियोजन आहे.
प्रवाशांसाठी दिलासा
सध्या शिवनेरी, शिवशाही आणि शिवाई बससेवांना मोठी मागणी
आहे. अनेकदा प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर नव्या
बससेवेमुळे प्रवाशांची गर्दी कमी होण्यास मदत होणार आहे.
बसची प्रमुख वैशिष्ट्ये
- ३x२ आसन रचना, ५६
आसन क्षमता
- अत्याधुनिक आणि
आरामदायी बस
- CCTV कॅमेरे
(४)
- GPS प्रणाली
- आपत्कालीन पॅनिक
बटन
- पब्लिक अनाउन्समेंट
सिस्टम
- इलेक्ट्रॉनिक
मार्गदर्शक फलक
या बस दोन शहरांदरम्यान शटल सेवेसारख्या धावणार असून
प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी करण्याचा उद्देश
आहे.
विकासाला गती
या उपक्रमामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम
होणार असून, प्रवाशांना आधुनिक सुविधा मिळणार आहेत.
नागपूरपासून सुरू होणारी ही सेवा लवकरच संपूर्ण राज्यभर विस्तारली जाणार आहे.