भरधाव बोलेरोचा तिहेरी अपघात; होंडा सिटीतील एकाचा मृत्यू, चार जखमी

धाराशिव – धाराशिव तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाटोदा–करजखेडा परिसरात रविवारी दुपारी भीषण तिहेरी अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या बोलेरो वाहनाने प्रथम वॅगनार कारला पाठीमागून धडक दिली आणि त्यानंतर नियंत्रण सुटल्याने कटडा तोडून समोरून येणाऱ्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडक दिली. या भीषण अपघातात होंडा सिटी कारमधील एका ज्येष्ठाचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एमएच-४५ एझेड ५४४९ क्रमांकाची बोलेरो गाडी लातूरच्या दिशेने भरधाव वेगाने जात होती. चालकाने मद्यपान केले असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. वेगावर नियंत्रण न राहिल्याने बोलेरोने पुढे असलेल्या वॅगनार कारला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यानंतर बोलेरो आणखी पुढे जाऊन रस्त्यावरील कटडा तोडत समोरून तुळजापूरच्या दिशेने येत असलेल्या होंडा सिटी कारला समोरासमोर धडकली. या अपघातात होंडा सिटी कारमधील जीवन वसंत पाटील (वय ७०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नित्यानंद मोहन बुके (वय ३५), मोहन बुके (वय ५५), अर्जुन पटुळे (वय ५५) व आणखी एक अनोळखी पुरुष (अंदाजे वय ४०) असे चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी शासकीय जिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे हलविण्यात आले आहे. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की काही काळ घटनास्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच बेंबळी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, तुळजापूर येथे पाठविण्याची व्यवस्था केली.

दरम्यान, या अपघातामुळे काही काळ तुळजापूर–लातूर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात पुढील तपास सुरू आहे. पाटोदा–करजखेडा परिसरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.