सोलापुरात उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मारहाण; अवैध मद्यविक्री कारवाईदरम्यान घटना
सोलापूर : माढा तालुक्यातील उपळाई हद्दीतील येडेश्वरी
ढाब्यावर अवैध मद्यविक्रीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या राज्य उत्पादन शुल्क
विभागाच्या अधिकाऱ्यांवर ढाबा मालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. या
घटनेत उपनिरीक्षक अमित नागरे आणि अंमलदार युवराज टिळे हे दोघे गंभीर जखमी झाले
आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाला टोल फ्री
क्रमांकावरून ढाब्यावर अवैध मद्यविक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार अधिकारी कारवाईसाठी तेथे पोहोचले. मात्र, ढाबा
मालकाने “राज्यात सगळीकडे मद्यविक्री सुरू आहे, तरी आमच्याच
ढाब्यावर कारवाई का?” असा सवाल करत अधिकाऱ्यांशी वाद घातला.
वाद वाढताच ढाबा मालकाने अधिकाऱ्यांवर प्लास्टिक पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे अधिकारी जखमी झाले. यावेळी गोंधळ सुरू असताना अंमलदार मोबाईलवर व्हिडिओ शूटिंग करत होते. आरोपीने त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला आणि परत केला नाही. जखमी अधिकाऱ्यांना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून उपनिरीक्षक अमित नागरे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या प्रकरणी माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून अवैध मद्यविक्रीविरोधातील कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अधोरेखित झाला आहे.