अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; पुराव्यांचा शोध सुरू

अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे घडलेल्या तरुणींच्या लैंगिक शोषण व व्हिडिओ व्हायरल प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमद याला पोलिसांनी अचलपूर येथे आणले. समरसपुरा पोलीस ठाण्याच्या पथकाने त्याची शहरातील मुख्य मार्गावरून धिंड काढत कारवाई केली. गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण करण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. आरोपीला अचलपूर शहराच्या प्रमुख भागातून फिरवण्यात आले. यावेळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती आणि या घटनेने परिसरात खळबळ उडाली. तपासादरम्यान पोलिसांना माहिती मिळाली आहे की, आरोपीने त्याच्या एका मित्राकडे काही संशयास्पद वस्तू लपवून ठेवल्या आहेत. या वस्तूंमध्ये मोबाईल, मेमरी कार्ड किंवा इतर महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या पोलीस त्या वस्तूंचा शोध घेत आहेत. अचलपूरच्या समरसपुरा पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.