दिल्ली हादरली! IRS अधिकाऱ्याच्या मुलीची घरात घुसून निर्घृण हत्या; आरोपी फरार

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील उच्चभ्रू परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमर कॉलनीतील कैलाश हिल्स येथे एका तरुणीची घरात घुसून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत तरुणी ही १९९७ बॅचमधील एका वरिष्ठ IRS अधिकाऱ्याची मुलगी असल्याची माहिती मिळाली असून, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी तरुणीचे आई-वडील नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉक आणि जिमसाठी बाहेर गेले होते. त्या वेळी तरुणी घरात एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश करून गुन्हा केला. आई-वडील परत आल्यानंतर त्यांना मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. प्राथमिक तपासात आरोपीने मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले आहे. घराची अवस्था पाहता, हत्येपूर्वी लैंगिक अत्याचार झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, याबाबत अंतिम निष्कर्ष पोस्टमॉर्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. या प्रकरणात काही महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकलेल्या एका जुन्या नोकरावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. तो सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. जुन्या वादातून किंवा सूडबुद्धीने हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

घटनेची माहिती मिळताच दिल्ली पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात येत असून आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. दरम्यान, मृत तरुणीने नुकतेच अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले होते आणि ती UPSC परीक्षेची तयारी करत होती. एका हुशार आणि आशादायी तरुणीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.