झोन ६ मध्ये पाणीपुरवठा व ड्रेनेज समस्यांवर आढावा बैठक, तात्काळ उपाययोजनांची मागणी

सोलापूर शहरातील पाणीपुरवठा आणि ड्रेनेज समस्यांच्या पार्श्वभूमीवर झोन क्रमांक ६ येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. ही बैठक उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस प्रभाग क्रमांक ६, २२ व २३ चे नगरसेवक, महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, ड्रेनेज विभागाचे सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर तसेच विभागीय कार्यालय क्रमांक ६ चे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक गणेश दादा वानकर यांनी नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा व ड्रेनेज समस्यांबाबत आक्रमक भूमिका मांडली. नागरिकांना वारंवार येणाऱ्या अडचणी तात्काळ सोडवाव्यात, अशी ठाम मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली.यावर अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी संबंधित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तसेच अशा प्रकारच्या आढावा बैठका नियमितपणे महिन्यातून किंवा दोन महिन्यांतून एकदा विभागीय स्तरावर आयोजित कराव्यात, अशी सूचना गणेश वानकर यांनी प्रशासनाला दिली. या बैठकीमुळे झोन ६ मधील पाणीपुरवठा व ड्रेनेज समस्यांच्या निराकरणासाठी ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.