कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ईको कार-मिक्सर ट्रक धडकेत ११ जणांचा मृत्यू
ठाणे : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर आज सकाळी
११ वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडून ११ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. कल्याणहून
मुरबाडच्या दिशेने प्रवास करणाऱ्या ईको कारला समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर
ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा हृदयद्रावक प्रकार घडला. या धडकेचा जोर इतका
जबरदस्त होता की ईको कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. कारमधील प्रवाशांना बाहेर
पडण्याची संधीही मिळाली नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारमधील बहुतांश प्रवासी जागीच मृत्यूमुखी पडले असून मृतांचा आकडा
वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
कसा घडला अपघात?
प्राथमिक माहितीनुसार, कल्याण ते मुरबाड दरम्यान
प्रवासी वाहतूक करणारी ईको कार पुलावरून जात असताना समोरून येणाऱ्या सिमेंट मिक्सर
ट्रकची तिला जोरदार धडक बसली. धडकेचा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव
घेतली.
मृतदेह बाहेर काढण्याची धावपळ
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने
मदतकार्य सुरू केले. कटरच्या साहाय्याने कारमधील मृतदेह बाहेर काढण्यात आले.
जखमींना जवळच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर
उपचार सुरू आहेत.
वाहतूक विस्कळीत
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान, मृतांची
ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
या भीषण घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून
महामार्गावरील सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.