प्रभाग ६ मध्ये रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ; आमदार देवेंद्र कोठेंकडून २८.७२ लाखांचा निधी

सोलापूर : शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक ६ मधील डोणगाव रस्त्यावरील सलगर वस्ती जवळील इंद्रप्रस्थ फेज तीन येथे रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. इंद्रप्रस्थ फेज तीन परिसरातील मुख्य रस्ता करण्याची मागणी नागरिकांकडून गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. विशेषतः पावसाळ्यात या रस्त्यावर चिखल व खड्ड्यांमुळे वाहनधारक आणि पादचारी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येबाबत परिसरातील नागरिकांनी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्याकडे मागणी केली होती. त्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी या मागणीची दखल घेत पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार रविवारी या कामाचा शुभारंभ करण्यात आला असून, या प्रकल्पासाठी २८ लाख ७२ हजार रुपयांचा विकास निधी मंजूर करण्यात आला आहे. काम सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत आमदार कोठे यांचे आभार मानले.

यावेळी माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, नूतन नगरसेवक गणेश वानकर, नगरसेविका मृण्मयी गवळी, सोनाली गायकवाड, विजया खरात तसेच महादेव गवळी, अर्जुन गायकवाड, पवन खांडेकर आदी उपस्थित होते.