सोलापुरात गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २१.४३९ किलो गांजा जप्त, आरोपी अटकेत
सोलापूर : शहर गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात
धडाकेबाज कारवाई करत गांजाची लागवड करून विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली
आहे. या कारवाईत एकूण ४ लाख ३९ हजार ९०० रुपये किमतीचा २१.४३९ किलो गांजा जप्त
करण्यात आला आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ
पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुकेश
गायकवाड व त्यांच्या पथकाने गस्तीदरम्यान जुना देगाव नाका परिसरातील थोबडे वस्ती
येथे संशयास्पद हालचाल करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले. तो प्लास्टिक पिशवीतून
गांजाच्या पुड्या विक्री करत असल्याचे आढळून आले. चौकशीत त्याने आपले नाव रजाक
गफुर शेख (वय ४९) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून २२७ ग्रॅम गांजा जप्त करण्यात
आला. पुढील तपासात आरोपीने आपल्या घराजवळ गांजाची लागवड केल्याची कबुली दिली.
त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ५९ गांजाची झाडे जप्त केली. या झाडांचे वजन २१.२१२
किलो असून, पिशवीतील गांजासह एकूण २१.४३९ किलो गांजा जप्त
करण्यात आला. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८७/२०२६
नोंदवण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यानुसार कलम २० (अ),
२० (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस
आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील आणि
सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत
गुन्हे शाखेच्या पथकाने उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.