सोलापुरात जुगाराच्या व्यसनामुळे हताश बापाची आत्महत्या; मुलाला शेवटचा व्हॉट्सअॅपवर मेसेज
सोलापूर : जुगाराच्या व्यसनामुळे सर्वस्व गमावलेल्या
एका हताश बापाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या
करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने आपल्या मुलाला व्हॉट्सअॅपवर शेवटचा भावनिक मेसेज
पाठवला होता. अनिल मारुती नरवडे (वय 57, रा. मुरारजी पेठ)
असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 28 मार्च रोजी
सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास त्यांनी सोलापूर-विजयपूर महामार्गावरील छत्रपती
संभाजी तलाव (कंबर तलाव) येथे उडी घेत आपले जीवन संपवले.
मुलाला शेवटचा मेसेज
आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मुलाला पाठवलेल्या
व्हॉट्सअॅप मेसेजमध्ये आपल्या जुगाराच्या व्यसनामुळे झालेल्या परिस्थितीची कबुली
दिली. “मला माफ कर, मी तुमच्या लायकीचा वडील ठरू शकलो नाही,”
असे भावनिक शब्द त्यांनी मेसेजमध्ये लिहिले होते. तसेच त्यांनी
आपल्या मुलाला गाडी गहाण ठेवल्याची माहिती देत ती सोडवण्याची जबाबदारीही
त्याच्यावर सोपवली. हा मेसेज सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत
असून शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कुटुंबीयांची माहिती
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल नरवडे यांना जुगाराचे व्यसन होते आणि त्यातूनच आर्थिक अडचणी वाढत
गेल्या. या नैराश्यातून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. या
घटनेमुळे नरवडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.