अनिल मंद्रूपकर यांना ‘अटल राष्ट्र सेवा पुरस्कार’
सोलापूर : सामाजिक कार्यात दीर्घकाळ योगदान देणारे सोलापूरचे
कार्यकर्ते अनिल मंद्रूपकर यांना ‘अटल राष्ट्र सेवा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात
आले. देशभरातील ६ राज्यांमध्ये ४७ वर्षे सातत्याने केलेल्या सामाजिक कार्याची दखल
घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियम
येथे माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात
आला. राष्ट्रकवी रामधारी सिंह दिनकर स्मृती न्यासाच्या वतीने दिवंगत पंतप्रधान अटल
बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार सुरू करण्यात आला आहे. अनिल
मंद्रूपकर यांनी १९७९ मध्ये गुजरातमधील मोरबी पूरग्रस्तांसाठी निधी संकलन करत
सामाजिक कार्याची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी युवक बिरादरी, लायन्स इंटरनॅशनल, वनराई, अलर्ट,
विविध फाउंडेशन आणि सामाजिक संस्थांमधून व्यापक काम केले. पर्यावरण
संरक्षणाच्या दृष्टीने त्यांनी २००६ मध्ये पुण्यात ‘इको फ्रेंड्स’ लायन्स क्लबची
स्थापना केली. या क्लबच्या माध्यमातून स्वच्छता, 3R तत्त्व (Reduce,
Reuse, Recycle) आणि ग्रामीण भागातील विकासासाठी अनेक उपक्रम
राबवण्यात आले. स्वच्छ भारत अभियानांतर्गत गावांमध्ये शौचालय बांधणी, सार्वजनिक स्वच्छता आणि पर्यावरण जनजागृतीचे काम त्यांनी प्रभावीपणे केले.
ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, मार्गदर्शन आणि
रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे कार्यही त्यांनी सातत्याने केले आहे.
त्यांच्या या योगदानामुळे समाजात सकारात्मक बदल घडून आले आहेत.
पुरस्कार स्वीकारताना त्यांनी सर्व सहकाऱ्यांचे आभार
मानले आणि “विकसित भारत” या ध्येयासाठी सामाजिक कार्य पुढेही सुरू ठेवण्याचा
संकल्प व्यक्त केला.