गोंदियात नर्सिंग विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा; ४५ जणी रुग्णालयात दाखल
गोंदिया : गोंदिया येथे शासकीय नर्सिंग महाविद्यालयातील ४५ विद्यार्थिनींना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी अचानक अनेक विद्यार्थिनींना उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. कॅन्टीनमधील जेवणानंतर प्रकृती बिघडली बाई गंगाबाई रुग्णालय परिसरातील शासकीय नर्सिंग महाविद्यालयात सुमारे १८५ विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. बुधवारी रात्री सर्व विद्यार्थ्यांनी कॅन्टीनमधील जेवण केले होते. रात्री उशिरा काही विद्यार्थिनींना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर गुरुवारी सकाळी सुमारे १० वाजता इतर विद्यार्थिनींनाही अशीच लक्षणे जाणवू लागली. ४५ विद्यार्थिनींवर उपचार सुरू त्रास वाढताच एकूण ४५ विद्यार्थिनींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी सर्वांची तपासणी करून उपचार सुरू केले असून सर्व विद्यार्थिनींची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले या घटनेनंतर विषबाधेचे नेमके कारण शोधण्यासाठी कॅन्टीनमधील अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजित गोल्हर यांनी रुग्णालयात भेट देऊन बाधित विद्यार्थिनींची विचारपूस केली आणि उपचारांची माहिती घेतली. प्रशासन सतर्क या घटनेमुळे महाविद्यालय प्रशासन आणि आरोग्य विभाग सतर्क झाला असून पुढील काळात अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.