सोलापूर शासकीय रुग्णालयात नवे MRI मशीन; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

सोलापूर : सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात लवकरच अत्याधुनिक एम.आर.आय. मशीन उपलब्ध होणार आहे. Devendra Fadnavis यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत यासंदर्भात आरोग्य विभागाला निर्देश दिले आहेत. सध्या रुग्णालयातील एम.आर.आय. मशीन सुमारे १२ वर्षे जुनी असून ती कालबाह्य झालेली आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयांत जाऊन महागडे एम.आर.आय. स्कॅन करावे लागत होते.

गोरगरीब रुग्णांना दिलासा

सोलापूरसह परिसरातील जिल्हे, तसेच कर्नाटक आणि तेलंगणातूनही मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येथे येतात. मात्र, एम.आर.आय. सुविधेअभावी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. नवीन टेस्ला-३ तंत्रज्ञानाची एम.आर.आय. मशीन उपलब्ध झाल्यास रुग्णांना स्वस्त आणि दर्जेदार तपासणीची सुविधा मिळणार आहे.

पाठपुराव्याला यश

आमदार देवेंद्र कोठे यांनी ११ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री यांना पत्र देऊन ही मागणी केली होती. तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही याबाबत पाठपुरावा केला होता.

मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी या प्रस्तावावर शेरा मारत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याने आता या प्रकल्पाचा मार्ग मोकळा झाला आहे.

आरोग्य सुविधांना चालना

या निर्णयामुळे सोलापुरातील शासकीय आरोग्य सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 अजित पवार यांच्याशीही चर्चा

काही महिन्यांपूर्वी पुण्यात झालेल्या विभागीय बैठकीत आमदार देवेंद्र कोठे यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेही नवीन एम.आर.आय. मशीनची मागणी केली होती. त्यावेळीही या विषयावर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.

सोलापूर हे कामगारांचे शहर असल्याने गोरगरीब रुग्णांना महागडी एम.आर.आय. तपासणी परवडत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने आता शासकीय रुग्णालयात नवीन एम.आर.आय. मशीन उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.”
देवेंद्र कोठे, आमदार