रुपाली चाकणकर यांनी दिला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ;राजीनाम्याचे दिले 'हे ' कारण...

नाशिकमध्ये अंकशास्त्राच्या आधारे भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या अशोक खरात याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक झाल्यानंतर राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांचे त्याच्यासोबतचे फोटो समोर आल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या सूचना केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अखेर रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी आपला राजीनामा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. अशोक खरात प्रकरणामुळे निर्माण झालेल्या वादळानंतर हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या प्रकरणावरून विरोधकांनी सरकारवरही निशाणा साधला होता. चाकणकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती. अखेर त्यांनी पदाचा त्याग केल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे.