सोलापुरात काँग्रेसचे अनोखे आंदोलन; नाल्यातून गॅस तयार करण्याचा प्रयोग करून केंद्र सरकारचा निषेध
सोलापूर : गॅस सिलेंडरच्या दरवाढीविरोधात सोलापूर शहर काँग्रेस
कमिटीच्या वतीने मंगळवारी अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. सोलापूर लोकसभा
मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन पार
पडले.
कुंभार वेस नाल्याजवळ शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतनभाऊ
नरोटे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
मांडलेल्या ‘नाल्यातून गॅस काढण्याच्या’ संकल्पनेचा संदर्भ देत प्रतिकात्मक प्रयोग
केला. नाल्यातून गॅस तयार करण्याचा प्रयत्न करून केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध
नोंदवण्यात आला. कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या प्रतिमेसमोर “हे मोदी बाबा, मेरी लाज रख लो आज, नाले से गॅस निकालो आज, चाय पकोडे बनालो आज” अशी आरती केली. तसेच “नाले का गॅस का सपना दिखाना बंद
करो, गॅस सिलेंडर सस्ता करो” अशा घोषणा देत सरकारकडे गॅस दर
कमी करण्याची आणि पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली.
सरकारच्या धोरणांवर टीका
यावेळी बोलताना शहराध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांनी केंद्र
सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की, मोदी सरकारच्या चुकीच्या आणि जनविरोधी
धोरणांमुळे देशात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असून सततच्या दरवाढीमुळे
सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. नरोटे म्हणाले, “गॅस
मिळवण्यासाठी नागरिकांना दिवसेंदिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक लघुउद्योग
बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे ‘नाल्यातून गॅस’ या संकल्पनेचा पर्दाफाश
करण्यासाठी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केले.” आंदोलनादरम्यान नाल्याजवळ उपकरणांच्या
सहाय्याने गॅस निर्मितीचा कथित प्रयोग करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात गॅस तयार
झाला नाही. त्यामुळे ही संकल्पना केवळ घोषणांपुरती मर्यादित असल्याचा दावा
काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला.
गॅस बुकिंगबाबतही नाराजी
सोलापूर शहर काँग्रेस ई-ब्लॉकचे अध्यक्ष उदयशंकर
चाकोते यांनीही सरकारवर टीका करत सांगितले की, गॅस सिलेंडर बुकिंगचे दिवस वाढवून सरकार
जनतेची दिशाभूल करत आहे. प्रत्यक्षात बुकिंग केल्यानंतरही नागरिकांना गॅस
एजन्सीसमोर तासन्तास आणि दिवसेंदिवस रांगेत उभे राहावे लागत आहे. ते म्हणाले की,
सणासुदीच्या काळात गॅस उपलब्ध नसल्याने महिला, हॉटेल व्यावसायिक आणि लघुउद्योजक मोठ्या अडचणीत आले आहेत. त्यामुळे गॅस
दरवाढ तात्काळ मागे घेऊन तुटवडा दूर करण्याची मागणी त्यांनी केली.
अनेक पदाधिकारी उपस्थित
या आंदोलनात माजी महापौर संजय हेमगड्डी, प्रदेश सचिव राहुल वर्धा, महिला अध्यक्षा प्रमिलाताई
तूपलवंडे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकीपंडला, सेवादल
यंग ब्रिगेड अध्यक्ष विवेक कन्ना, उद्योग व वाणिज्य
सेल अध्यक्ष पशुपती माशाळ, असंघटित कामगार सेल
अध्यक्ष सुभाष वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या
संख्येने उपस्थित होते.