तन्वी कोलते ‘बिग बॉस मराठी 6’ची विजेती

लोकप्रिय रिअॅलिटी शो बिग बॉस मराठीच्या सहाव्या सिझनचा थरार अखेर संपला असून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तन्वी कोलते हिने विजेतेपद पटकावले आहे. गेल्या १०० दिवसांपासून सुरू असलेल्या या सिझनमध्ये एकूण १७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. प्रेक्षकांना खिळवून ठेवणाऱ्या या शोमध्ये तन्वी सुरुवातीपासूनच प्रबळ दावेदार मानली जात होती आणि अखेर तिने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव तन्वीच्या विजयावर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत असून तिच्या गेमप्लेची मोठी चर्चा आहे.

राखी सावंतची खास ऑफर

दरम्यान, अभिनेत्री राखी सावंत हिने तन्वीला हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी होण्याची ऑफर दिल्याची चर्चा रंगली आहे. राखी सावंतने तन्वीसोबत एक व्हिडिओ शेअर करत म्हटले की, “मी पहिल्या दिवसापासून सांगत होते की तन्वीच जिंकणार.” यावर तन्वीनेही तिच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. यानंतर राखीने थेट सलमान खान यांना उद्देशून तन्वीला हिंदी बिग बॉसमध्ये घेण्याची मागणी केली. तसेच ती स्वतः वाइल्ड कार्ड एंट्रीने येण्याची विनोदी टिप्पणीही केली.

पुढे काय?

या व्हिडिओनंतर तन्वी कोलते हिंदी बिग बॉसमध्ये सहभागी होणार का, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सध्या सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा सुरू आहे.