सोलापुरात चैन स्नॅचिंगचा गुन्हा २ दिवसांत उघड; दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात
सोलापूर : फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या डी.बी.
पथकाने चैन स्नॅचिंगचा गुन्हा अवघ्या दोन दिवसांत उघड करत दोन विधीसंघर्षग्रस्त
बालकांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत ५ लाख ५८ हजार ५८८ रुपयांचा मुद्देमाल
हस्तगत करण्यात आला आहे. दि. ७ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी अवंती नगर परिसरात
फिर्यादी सौ. विजयालक्ष्मी सावळे (वय ६६) या आपल्या मैत्रिणींसह पायी जात असताना
काळ्या रंगाच्या पल्सर दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील
मणी मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून नेले होते. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण
निर्माण झाले होते. या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात
आला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी डी.बी. पथकाला तात्काळ
तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजची
तपासणी केली. तसेच तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड
येथे जाऊन दोन दिवस सतत शोधमोहीम राबविण्यात आली. या कारवाईत दोन विधीसंघर्षग्रस्त
बालकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मौजमजा आणि व्यसनासाठी पैसे
मिळविण्यासाठी हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ३३
ग्रॅम सोन्याचे मणी मंगळसूत्र, गुन्ह्यात वापरलेली पल्सर २२०
मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण ५.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही
कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे
सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर व त्यांच्या पथकाने पार पाडली. या जलद
कारवाईमुळे नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास वाढला आहे.