IPL 2026: ईडन गार्डन्सवर थरार; मुकुल चौधरीच्या तुफानी खेळीने लखनौचा रोमांचक विजय

Indian Premier League 2026 मधील १५ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात ईडन गार्डन्स येथे जबरदस्त थरार पाहायला मिळाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात लखनौने ३ गडी राखून विजय मिळवला.  लखनौच्या विजयाचा शिल्पकार ठरला युवा खेळाडू मुकुल चौधरी. ७ बाद १२८ अशा कठीण परिस्थितीत त्याने केवळ २७ चेंडूत नाबाद ५४ धावा करत सामना पलटवला. त्याच्या खेळीत ७ षटकारांचा समावेश होता. केकेआरकडून अजिंक्य रहाणे (४१) आणि अंगकृष रघुवंशी (४५) यांनी डाव सावरला. शेवटी कॅमेरून ग्रीन (३२*) आणि रोवमन पॉवेल (३९*) यांच्या फटकेबाजीमुळे केकेआरने १८१ धावांचा मजबूत टप्पा गाठला. प्रत्युत्तरात लखनौची सुरुवात डळमळीत झाली. ऋषभ पंत, निकोलस पूरन आणि मिचेल मार्श यांसारखे प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले. मात्र आयुष बडोनी (५४) आणि मुकुल चौधरी यांनी शानदार भागीदारी करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. शेवटच्या षटकात मुकुलने निर्णायक फटके मारत लखनौला सलग दुसरा विजय मिळवून दिला. २१ वर्षीय मुकुल चौधरी हा राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू असून त्याला लखनौने २.६० कोटींना संघात घेतले होते. या सामन्यातील कामगिरीनंतर तो आयपीएलमधील नवा स्टार म्हणून समोर आला आहे.