भोंदू अशोक खरातविरोधात सोलापुरात तीव्र आंदोलन; पुतळ्याचे दहन

सोलापूर : राज्यात वाढत चाललेल्या अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) यांच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या निषेधार्थ त्याच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशी देऊन दहन करण्यात आले. जिल्हा परिषद येथील पूनम गेट परिसरात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते व माजी आमदार नरसय्या आडम (मास्तर) आणि जिल्हा सचिव कॉ. युसुफ शेख यांनी केले. यावेळी कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  नरसय्या आडम यांनी सांगितले की, तंत्र-मंत्र आणि अंगारे-धुपाऱ्यांच्या नावाखाली महिलांचे व सर्वसामान्यांचे शोषण सुरू असून, अशा प्रकरणांमध्ये काही लोकप्रतिनिधींचाही सहभाग असल्याचे गंभीर आरोप समोर येत आहेत. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. महिला संघटनेच्या राज्याध्यक्षा कॉ. नसीमा शेख यांनी राज्यात अशा भोंदू बाबांचे जाळे वाढत असल्याचा आरोप केला. तसेच माकपच्या नेत्या नलिनीताई कलबुर्गी यांनी आरोपींची मालमत्ता जप्त करून ती अंधश्रद्धा निर्मूलनासाठी वापरण्याची मागणी केली. या आंदोलनादरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता.

मुख्य मागण्या:

  • अशोक खरात व त्याच्या सहकाऱ्यांवर कठोर कारवाई
  • राज्यभर भोंदू बाबांविरोधात विशेष मोहीम
  • प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष
  • जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी
  • सोशल मीडियावरील अंधश्रद्धाजन्य प्रचारावर बंदी

या आंदोलनातून अंधश्रद्धेविरोधात कठोर भूमिका घेण्याची मागणी पुन्हा एकदा अधोरेखित झाली.