“माझ्या मुलीचा मृत्यू आत्महत्या नाही”; धनश्री जगताप प्रकरणात कुटुंबीयांचा संतप्त सवाल
पंढरपूर : “माझ्या मुलीचा मृत्यू ही आत्महत्या नसून
तो एक संशयास्पद मृत्यू आहे. दहा दिवस उलटूनही सर्व आरोपींना अटक का झाली नाही?”
असा संतप्त सवाल मंगळवेढा तालुक्यातील धनश्री संदीप जगताप यांच्या
माहेरच्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणात पतीला अटक झाली असली तरी सासू आणि
सासरे अद्याप फरार असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच मयत धनश्रीचा दीर
पोलीस खात्यात कार्यरत असल्यामुळे तपासात जाणीवपूर्वक विलंब केला जात असल्याचा
गंभीर आरोप धनश्रीचे वडील आप्पासो श्रीरंग मोरे यांनी केला आहे. न्याय न
मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा
कुटुंबीयांनी दिला आहे.
नेमके प्रकरण काय?
मंगळवेढा तालुक्यातील ढवळस येथील रहिवासी आप्पासो मोरे
यांची मुलगी धनश्री हिचा विवाह संदीप गौतम जगताप याच्याशी झाला होता. ४
मार्च २०२६ रोजी धनश्रीचा विहिरीत पडून संशयास्पद मृत्यू झाला. या प्रकरणी ७ मार्च
रोजी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी पती संदीप जगताप
याला अटक केली आहे. मात्र सासरे गौतम दाजी जगताप आणि सासू रंजना गौतम
जगताप हे अद्याप फरार असल्याचे सांगितले जात आहे.
पोलीस कर्मचाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न?
धनश्रीचे वडील आप्पासो मोरे यांनी १४ मार्च रोजी मंगळवेढा
पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप केले आहेत. धनश्रीचा दीर सत्यजित
गौतम जगताप हा पोलीस कर्मचारी असून त्याच्यावर वारंवार मानसिक त्रास दिल्याचा
आरोप आहे.
असे असूनही पोलिसांकडून त्याच्याविरुद्ध तक्रार नोंदवून
घेतली जात नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या गुन्ह्यात सत्यजित याचाही
सहभाग असू शकतो, त्यामुळे त्यालाही आरोपी करून अटक
करण्याची मागणी मोरे कुटुंबीयांनी केली आहे.
कुटुंबीयांचे तपासावर प्रश्न
धनश्रीच्या मृत्यूबाबत कुटुंबीयांनी अनेक प्रश्न उपस्थित
केले आहेत. मुलगी स्वतःचा दूरध्वनी घरी ठेवून विहिरीकडे कशी गेली, विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असताना मृतदेह बाहेर कोणी काढला, तसेच आरोपींचे दूरध्वनी नोंदी आणि ठिकाणाची माहिती का तपासली जात नाही,
असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.
तीव्र आंदोलनाचा इशारा
वारंवार पोलीस ठाण्यात जाऊनही तपासात प्रगती होत नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. “फरार सासू-सासरे आणि दीर यांना तात्काळ अटक करून योग्य तपास केला नाही, तर आम्ही सर्व नातेवाईक पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसू आणि तीव्र आंदोलन करू,” असा इशारा धनश्रीच्या वडिलांनी दिला आहे. आता या प्रकरणात पोलिसांकडून पुढे कोणती कारवाई होते आणि धनश्रीला न्याय मिळतो का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.