तीन दिवसीय व्हिजन एक्स्पोला उत्स्फूर्त प्रतिसाद; पुढील वर्षी अधिक भव्य आयोजनाचा निर्धार

सोलापूर : सहकार भारतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिजन एक्स्पो फॉर वुमन एम्पॉवरमेंट’ या तीन दिवसीय प्रदर्शनाला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचा समारोप २६ एप्रिल रोजी नॉर्थकोट मैदानावर पार पडला. या वेळी स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी सांगितले की, नागरिकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे पुढील वर्षी या एक्स्पोचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात करण्यात येणार आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना व्यासपीठ मिळावे आणि त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी, या उद्देशाने सोलापूर जिल्हा सहकार भारतीने हा उपक्रम प्रथमच आयोजित केला होता. राज्यभरातील महिला उद्योजिकांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. या कार्यक्रमाला सहकार भारतीचे प्रदेश संपर्क प्रमुख संजय परमणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी सहकार क्षेत्रात महिलांच्या सहभागाचे कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे उद्योग-व्यवसायाला चालना मिळत असल्याचे सांगितले.

सोलापूर जिल्हा सहकार भारतीचे अध्यक्ष किरण करकमकर यांनी सांगितले की, या एक्स्पोमुळे सहकार भारतीचे कार्य राज्यभर पोहोचले असून सामान्य महिलांना उद्योग व्यवसायासाठी प्रोत्साहन मिळत आहे. या तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या महिला उद्योजिकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अ‍ॅड. अर्चना कुलकर्णी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राची धामणगांवकर यांनी केले.

समारोप सोहळ्यास सहकार भारतीचे विविध पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.