कोल्हापुरात अंत्यविधीच्या गडबडीत घरफोडी; 16 तोळे सोन्याचे दागिने लंपास
कोल्हापूर : दुःखाच्या प्रसंगीही चोरट्यांनी संधी
साधल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. लक्ष्मीपुरी मंडई परिसरातील
रहिवासी हमीदा अब्दुलमजीद खाटिक (वय 70) यांच्या निधनानंतर कुटुंबीय
अंत्यविधीच्या तयारीत व्यस्त असताना चोरट्याने घरातील 16 तोळे
सोन्याचे दागिने आणि चांदीचे अलंकार लंपास केले. मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपुरी मंडईतील तीन मजली इमारतीत राहणाऱ्या खाटिक यांचे मंगळवारी
रात्री निधन झाले. बुधवारी त्यांच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना कुटुंबीय आणि
नातेवाईक तळमजल्यावर जमले होते. याच दरम्यान चोरट्याने वरच्या मजल्यावर जाऊन
त्यांच्या खोलीतील लाकडी कपाट फोडून दागिने चोरले. सुमारे तासाभराने कुटुंबातील
सदस्य खोलीत गेले असता घरातील साहित्य विस्कळीत अवस्थेत आढळले आणि चोरीचा प्रकार
उघडकीस आला. या घटनेमुळे आधीच दुःखात असलेल्या कुटुंबीयांना दुहेरी धक्का बसला. घटनेची
माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिस
निरीक्षक श्रीराम कण्हेरकर आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक खंडू गायकवाड यांच्या
मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये इमारतीच्या मागील
बाजूने एक संशयित तरुण बाहेर पडताना दिसला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
फॉरेन्सिक पथक, ठसेतज्ज्ञ आणि श्वानपथक यांनाही
घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र श्वानपथक परिसरातच घुटमळल्याची माहिती आहे.
प्राथमिक तपासात घरातील माहिती असलेल्या व्यक्तीचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली
जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण
निर्माण झाले आहे. दुःखाच्या प्रसंगीही चोरी होत असल्याने नागरिक सतर्क झाले आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, संशयास्पद हालचाली
आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.