Bigg Boss Marathi 6 चा धमाकेदार प्रोमो प्रदर्शित; पुन्हा एकदा रितेश देशमुख करणार होस्टिंग
Bigg Boss Marathi 6 ची आतुरतेने वाट
पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बिग बॉस मराठीच्या
पाचव्या सीझननंतर सहाव्या सीझनबाबत प्रचंड उत्सुकता होती. अखेर या नव्या सीझनचा
अधिकृत प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून, त्याने सोशल
मीडियावर चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. या प्रोमोच्या माध्यमातून बिग बॉस मराठी
6 चे होस्ट कोण असणार, यावर
शिक्कामोर्तब झाले आहे. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता रितेश देशमुख पुन्हा एकदा बिग
बॉस मराठीच्या सहाव्या सीझनचे होस्टिंग करणार आहे. पाचव्या सीझनमधील त्याच्या
सादरीकरणाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्मात्यांनी त्याच्यावरच
विश्वास टाकला आहे.
प्रोमोमध्ये काय खास?
प्रोमोची सुरुवात “आला रे असा… असं” या दमदार डायलॉगने
होते. दारात मोठी रांगोळी, झेंडूच्या फुलांचे तोरण, ढोल-ताशांचा गजर आणि पर्पल रंगाच्या शेरवानीमध्ये पाठमोरा उभा असलेला
अभिनेता सर्वांचे लक्ष वेधून घेतो. त्यानंतर स्क्रीनवर “Bigg Boss Marathi लवकरच” असा मजकूर दिसतो. प्रोमोला “आला रे आला…!! आपला लाडका रितेश भाऊ
आला… घेऊन एकदम लय भारी धमाका…” असे कॅप्शन देण्यात आले आहे.
त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये काहीतरी वेगळे आणि धमाकेदार पाहायला मिळणार, असा अंदाज चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे.
संभाव्य स्पर्धकांची चर्चा
दरम्यान, सहाव्या सीझनमध्ये कोणते स्पर्धक सहभागी
होणार याबाबतही चर्चांना उधाण आले आहे. प्रसिद्ध युट्युब स्टार विनायक माळी आणि
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या लोकप्रिय मालिकेतून ओळख मिळवलेली अभिनेत्री गिरीजा
प्रभू यांची नावे संभाव्य स्पर्धकांमध्ये पुढे येत आहेत. मात्र, अधिकृत यादी अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.