जळगाव हादरलं: भुसावळच्या साक्री गावात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या; गावात तणावाचे वातावरण

भुसावळ तालुक्यातील साक्री गावात दोन अल्पवयीन शाळकरी मुलींची विहिरीत ढकलून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत गावाजवळील एका विहिरीत हा थरारक प्रकार घडला. या घटनेमुळे संपूर्ण गाव हादरून गेले असून भीतीचे वातावरण पसरले आहे. प्राप्त माहितीनुसार, दोन्ही मुली गावातीलच रहिवासी होत्या आणि नियमितपणे शाळेत जात होत्या. सकाळी शाळेत जात असताना एका अज्ञात इसमाने त्यांना अडवून जवळच्या विहिरीत ढकलल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत दोन्ही चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला.

ग्रामस्थ संतप्त; संशयितावर आरोप

घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. संतप्त ग्रामस्थांनी नरेंद्र चौधरी याच्यावर संशय व्यक्त करत त्याला तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने काही काळ गावात तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांची तातडीची कारवाई

भुसावळ तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. संशयित नरेंद्र चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, काही संतप्त ग्रामस्थांनी संशयिताला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न केल्याने तणाव अधिक वाढला होता. मात्र, पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करत परिस्थिती आटोक्यात आणली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत पोलीस सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत. या अमानुष घटनेमुळे साक्री गावासह संपूर्ण भुसावळ तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.