वादानंतर मृण्मयी देशपांडेचा मोठा निर्णय; ‘मनाचे श्लोक’ चित्रपटाचं प्रदर्शन थांबवलं, नवीन नावासह पुन्हा रिलीज

मुंबई | 2 ऑक्टोबर २०२५मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मृण्मयी देशपांडेच्या मनाचे श्लोक’ या चित्रपटावर वादाची सावली पडली आहे. शुक्रवारी म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या शीर्षकावरून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतला, कारण हे शीर्षक श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांशी साधर्म्य राखतं. या आक्षेपामुळे पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी शो बंद पाडण्यात आले, ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. या पार्श्वभूमीवर अभिनेत्री-दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडेने सोशल मीडियावरून महत्त्वाची घोषणा केली आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे —नमस्कार! ‘मना’चे श्लोक या आमच्या चित्रपटाच्या प्रदर्शनावरून काल आणि आज पुणे, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या त्या अतिशय दुःखद आहेत. Z MUSIC CO. हा संपूर्ण घटनाक्रम पाहता आम्ही या चित्रपटाचं प्रदर्शन संपूर्ण महाराष्ट्रात थांबवत आहोत आणि सिनेमाच्या नवीन नावासह येत्या गुरुवारी, १६ ऑक्टोबर २०२५ रोजी पुन्हा एकदा हा चित्रपट प्रदर्शित करत आहोत. भेटूयात!” मृण्मयीने केवळ अभिनयच नाही तर या चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. चित्रपटात राहुल पेठे, पुष्कराज चिरपूटकर, सुव्रत जोशी, सिद्धार्थ मेनन, हरीश दुधाडे आणि करण परब या तरुण कलाकारांसह लीना भागवत, मंगेश कदम, शुभांगी गोखले आणि उदय टिकेकर यांसारखे अनुभवी कलाकारही झळकणार आहेत. चित्रपटाच्या नव्या नावाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, मात्र सिनेरसिकांना आता १६ ऑक्टोबरला नव्या नावासह या चित्रपटाची प्रतीक्षा लागली आहे.