छत्रपती शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावरून बागेश्वर बाबांवर संताप; अटकेची मागणी
नवी दिल्ली : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री
यांनी नागपूर येथील कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानावरून देशभरात संताप व्यक्त केला
जात आहे.
नागपूरमधील जामठा परिसरात आयोजित कार्यक्रमात बोलताना
धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी
रामदास स्वामींकडे सत्ता सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असा दावा केला. या विधानानंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या
आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे आराध्य दैवत मानले जात
असल्याने त्यांच्या संदर्भातील अशा विधानामुळे अनेक सामाजिक आणि राजकीय नेत्यांनी
नाराजी व्यक्त केली आहे. शास्त्री यांच्या वक्तव्याला इतिहासाशी विसंगत आणि
आक्षेपार्ह असल्याचे म्हणत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि नेत्यांनी धीरेंद्र
कृष्ण शास्त्री यांना अटक करण्याची मागणी केली आहे. प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता
असून प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले आहे.
‘खरात बाबासोबत खरंतर ट्रिटमेंटला पाठवायला
हवे’ – अमोल मिटकरी
अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, बागेश्वर धामचा भोंदूबाबा धीरेंद्र शास्त्रीच्या तोंडून “वदवून घेतलेला”
चुकीचा इतिहास महाराष्ट्र कधीही खपवून घेणार नाही. या बाबाला खरात बाबासोबत खरंतर
ट्रिटमेंटला पाठवायला हवे. बाहेरच्या उपऱ्यांनी महाराष्ट्रात यावं आणि छत्रपतींवर
बोलावं ही एक नवीन चाल तमाम शिवप्रेमींनी लक्षात घ्यायला हवी. शिवाजी महाराजांनी
निर्माण केलेलं स्वराज्य हे कुणाच्या झोळीत समर्पित करण्याइतपत बोलायची हिम्मत अशा
मुर्खांमध्ये येते कुठून हा खरा प्रश्न आहे.. “तुका म्हणे ऐशा नरा |मोजुनी माराव्या पैंजारा ||”
भाजप-संघाचा ठरवून केलेला हा कट आहे का?- विजय वडेट्टीवार
तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी एक्स पोस्ट केली.
“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रीचा जाहीर निषेध!
छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी स्वराज्य उभे केले होते. स्वराज्य उभारताना
आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, बरीदशाही
इमादशाही यांच्यासह उत्तरेतील मोगल, प्रदेशातून आलेले इंग्रज,
डच, फ्रेंच या सर्वांनी छत्रपती शिवाजी
महाराजांच्या पराक्रमासमोर गुडघे टेकले. हा जाज्वल्य इतिहास असताना धीरेंद्र
शास्त्रीने सार्वजनिक मंचावरून छत्रपतींच्या पराक्रमाचा अवमान केला. सर्वात
संतापजनक म्हणजे मुख्यमंत्री, केंद्रिय मंत्री गडकरी,
संघाचे सरसंघचालक मंचावर बसलेले असताना धीरेंद्र शास्त्रीकडून
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सुरू होता. असे असताना यातील कोणीही धीरेंद्र
शास्त्रीला अडवले नाही?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विद्रुपीकरण
करण्याचा मनुवादी भाजप-संघाचा ठरवून केलेला हा कट आहे का? महाराष्ट्र धर्माला संपवण्याचा हा घाट आहे का? या
भोंदू बाबाला अटक झालीच पाहिजे, महाराष्ट्र धर्माला नख
लावणाऱ्या प्रत्येक वृत्तीला वेळीच चाप बसला पाहिजे! स्वतःला छत्रपतींचे वंशज
म्हणवणारे ते संजय गायकवाड कुठे आहेत? धीरेंद्र शास्त्रीला
ढगात कधी पोहोचणार आहेत? या भोंदूला शिव्या द्या दणकून
महाराष्ट्र तुमचा सत्कार करेल.. आहे का हिंमत?” असे आव्हान
वडेट्टीवार यांनी दिले.
धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करून अटक करावी – हर्षवर्धन सपकाळ
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही एक्स
पोस्ट करत या विधानाचा निषेध केला. “संघ भाजपने पोसलेले, गायपट्ट्यातून महाराष्ट्रात येत आपला महाराष्ट्र धर्म नासवणाऱ्या या
धीरेंद्र शास्त्री सारख्या ढोंगी बाबांना महाराष्ट्रातील जनतेनेच आता चपलांचा मार
देत हाकलून लावायला हवे. आज तर या भोंदूने विधान केले की, “छत्रपती
शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि थकलेल्या शिवाजी महाराजांनी आपल्या
मस्तकावरचा मुकुट काढून रामदास स्वामींच्या चरणी ठेवला. आपला राज्यकारभार त्यांनी
पाहावा अशी विनंती थकलेल्या महाराजांनी केली…” या वक्तव्याचा निषेध करावा तेवढा
कमी आहे. छत्रपती शिवाजी महाराज व त्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य या संघ
भाजपच्या मनूवादी विचारसणीला नेहमीच खुपत आलं. Bageshwar Baba आज ही ढोंगी लोक या मराठी भूमीचं प्रेरणास्थान असलेल्या आपल्या छत्रपती
शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं काम या भोंदूकडून करून घेत आहेत, हा बोलका पोपट आहे. याने हे वक्तव्य केले तेव्हा मंचावर सरसंघचालक मोहन
भागवत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित होते, पण या
विकृत बाबाला या महाराष्ट्राच्या या महान नेत्यांनी रोखलं नाही, यावरूनच लक्षात येतं, भाजप आणि संघ परिवारातील या
मंडळींच्या मनात आपल्या महाराजांबद्दल किती खालच्या स्तराचे विचार आहेत.
या वक्तव्याचा जाहीर निषेध, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जरा तरी लाज
शिल्लक असेल तर त्यांनी या भोंदू धीरेंद्र शास्त्री वर गुन्हा दाखल करून अटक करावी,”
असे सपकाळ म्हणाले.
काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?
नागपूरमधील कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री
यांनी दावा केला की, “छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध
करता करता थकले, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना वाटलं की
आता आपण थकलोय, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ
रामदास स्वामी यांच्याकडे गेले आणि आपले मुकुट काढले व सांगितले की, मी अनेक लढाई लढलो, अनेक युद्ध केले, पण आता पुढे लढायचे नाही.
तुम्ही एक दया करा की, हे मुकुट तुम्हा आता सांभाळा, हे राज्य सांभाळा…तुमच्या आदेशानेच आम्ही चाललो, मात्र आता आमच्याकडून युद्ध लढले जात नाही. आता आम्हाला विश्राम हवा आहे. यावर रामदास स्वामी म्हणाले की, ठीकं मी स्वीकार करतो. पण एक गोष्ट मला सांगायची आहे की, तुम्ही माझे कोण आहात?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, मी तुमचा शिष्य आहे. रामदास स्वामी म्हणाले, मी कोण आहे?, यावर छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, तुम्ही आमचे गुरु आहात.
मग रामदास स्वामींनी विचारलं, मग शिष्यचं कर्तव्य काय?, यावर शिवराय म्हणाले,
जे गुरु आदेश देतील. यानंतर रामदास स्वामींनी मुकुट उचलून छत्रपती
शिवाजी महाराजांच्या डोक्यावर घातलं आणि म्हणाले, आजपासून
माझं राज्य आहे. मी राज्य चालणार. पण आज्ञा तुम्हाला आहे. तुम्हाला संचालन करायचं
आहे”,