सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये दरोड्याचा कट उधळला; आरपीएफकडून ९ महिलांची टोळी ताब्यात
सोलापूर : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात रेल्वे
सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठी कारवाई करत मुंबई-सोलापूर सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये
होणारा दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला. संशयास्पद हालचाली करणाऱ्या ९ महिलांची
टोळी ताब्यात घेण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर सीपीडीएस
पथकाचे हेड कॉन्स्टेबल शिवाजी मुंडे यांनी तीन महिलांना संशयास्पद स्थितीत फिरताना
पाहिले. चौकशी करून त्यांना स्थानक सोडण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्या
महिलांची टोळी लातूरकडे जाणाऱ्या गाडीत चढल्याने संशय अधिक बळावला. यानंतर
कुर्डुवाडी येथील आरपीएफने सोलापूर विभागाला सतर्कतेचा इशारा दिला.
यानंतर संबंधित महिला जेऊर स्थानकावर उतरून मुंबई-सोलापूर
सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये दरोड्याच्या उद्देशाने चढल्या. मात्र सतर्क असलेल्या
आरपीएफने तत्काळ हालचाल करत कारवाई सुरू केली. एस्कॉर्टिंग पथकातील हेड कॉन्स्टेबल
हरमेंद्र प्रसाद मीना आणि कॉन्स्टेबल ब्रजेश यादव यांना सतत माहिती देण्यात येत
होती. संशयित महिलांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांचे फोटो आणि
प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीद्वारे देखरेख करण्यात आली.
सोलापूर रेल्वे स्थानकावर पोहोचताच कॉन्स्टेबल सोनम पठाण
यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथक सज्ज होते. गाडी स्थानकात येताच सर्व संशयित
महिलांना ताब्यात घेण्यात आले. या महिलांचे वय १८ ते ४० वर्षांदरम्यान असून त्या
धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, धावत्या रेल्वेत दरोडा टाकणाऱ्या महिलांची टोळी सोलापूर आणि पुणे विभागात
सक्रिय असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतची माहिती पुणे विभागालाही
देण्यात आली आहे.
प्रवाशांनी सतर्क राहून कोणतीही संशयास्पद हालचाल
दिसल्यास तत्काळ रेल्वे प्रशासनाला कळवावे किंवा मदतीसाठी १३९ या हेल्पलाईन
क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.