लोणावळा एक्स्प्रेस वेवर ट्रॅफिक ब्लॉक; डोंगरगाव-कुसगाव उड्डाणपूल अंतिम टप्प्यात
लोणावळा: पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील डोंगरगाव-कुसगाव
परिसरात सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलाच्या
कामासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून दोन दिवसांचा विशेष ट्रॅफिक
ब्लॉक घेण्यात आला आहे. आज शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या वेळेत पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवली जाणार आहे.
एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत
महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या मिसिंग लिंक प्रकल्पाची सुरुवात ज्या ठिकाणाहून
होते, तिथेच हा उड्डाणपूल उभारला जात आहे. सध्या या पुलाचे शटरिंग काढणे आणि
रंगकामाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मिसिंग लिंकचे कामही शेवटच्या टप्प्यात असून,
हा उड्डाणपूल पूर्ण होणे त्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जात
आहे. वाहतुकीचे नियोजन आणि अंमलबजावणी प्रशासनाने दिलेल्या नियोजनानुसार, गुरुवारी मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 वाजता बंद होणे अपेक्षित होते.
मात्र, तांत्रिक कारणास्तव आणि पूर्वतयारीसाठी सकाळी 11
वाजल्यापासूनच वाहने थांबवण्यास सुरुवात करण्यात आली. यामुळे प्रवासाचे नियोजन
करून निघालेल्या अनेक वाहनचालकांना काही काळ खोळंबून राहावे लागले. पुण्याकडे
जाणारी वाहतूक (दुपारी 12 ते 3) - बंद राहणार. साधारणपणे एक्स्प्रेस वेवर ब्लॉक
असल्यास सर्व वाहतूक जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वळवली जाते, ज्यामुळे मावळ परिसरात मोठी वाहतूक कोंडी होते. मात्र, आज प्रशासनाने आधीच आवाहन केल्याने अनेक नागरिकांनी या वेळेत प्रवास
टाळला.परिणामी, जुन्या महामार्गावर वाहनांची संख्या मर्यादित
राहून वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी दुपारी 12 ते 3 या
वेळेत पुण्याकडे येणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा किंवा शक्य
असल्यास ब्लॉकची वेळ टाळून आपला प्रवास निश्चित करावा, जेणेकरून
गैरसोय होणार नाही.