२.५ लाखांना बाभळीचा पाला विकणारा मनोहरमामा भोसले अटकेत; फसवणूक आणि लैंगिक शोषण प्रकरण पुन्हा चर्चेत

स्वतःला संत बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगत भक्तांची फसवणूक करणारा मनोहर भोसले याला अखेर अटक करण्यात आली आहे. पुण्यातून झालेल्या अटकेनंतर करमाळा आणि बारामती परिसरातील त्याचे जुने कारनामे पुन्हा समोर आले असून मोठी खळबळ उडाली आहे.

बारामती तालुक्यातील बारामती पोलीस ठाण्यात शशिकांत खरात यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, “मी बाळूमामाचा अवतार असून कर्करोग बरा करतो” असे खोटे सांगून भोसलेने त्यांची फसवणूक केली. उपचाराच्या नावाखाली बाभळीचा पाला, साखर आणि भंडारा यांसारख्या वस्तू अत्यंत चढ्या दराने विकत घेण्यास भाग पाडत त्यांच्याकडून तब्बल २ लाख ५१ हजार रुपये उकळले.

या प्रकरणात महाराष्ट्र नरबळी आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बारामती पोलिसांनी त्याला अटक केली होती.

दरम्यान, भोसलेवर लैंगिक शोषणाचेही गंभीर आरोप आहेत. ९ सप्टेंबर २०२१ रोजी करमाळा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, उंदरगाव येथील आश्रमात भोसले आणि त्याच्या साथीदारांनी एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

पहिल्या तक्रारीनंतर भोसलेने उंदरगाव येथील मठ बंद केला, मात्र त्यानंतर करमाळा तालुक्यातील घोटी येथे नवीन आश्रम सुरू केला. येथे अमावास्या आणि पौर्णिमेला हजारो भक्त भविष्य जाणून घेण्यासाठी गर्दी करत असत.

नाशिकमधील फसवणुकीचे प्रकरण उघड झाल्यानंतर तो फरार झाला होता. मात्र पुणे पोलिसांनी त्याचा शोध घेत अखेर अटक केली आहे. सध्या त्याच्या विरोधातील सर्व प्रकरणांचा तपास सुरू असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.