मुक्तसरमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ ठार, अनेक जखमी

चंदीगड : पंजाबमधील मुक्तसर साहिब जिल्ह्यातल्या सिंघेवाला-फतुहीवाला गावात गुरुवारी रात्री फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला असून किमान २५ कामगार जखमी झाले आहेत. स्फोटानंतर संपूर्ण इमारत कोसळली असून, अनेकजण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकलेले आहेत. ही दुर्घटना रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. सिंघवली-कोटली रस्त्यालगत असलेल्या फटाके उत्पादन व पॅकेजिंग कारखान्यात स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की संपूर्ण इमारत क्षणार्धात पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. कामगारांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजुरांची संख्या अधिक स्थानिक कामगार अरुण सक्सेना यांनी सांगितले की, सुमारे ४० कामगार दोन शिफ्टमध्ये येथे काम करत होते. यातील अनेक आपल्या कुटुंबीयांसह तिथेच वास्तव्यास होते. बहुतांश मजूर उत्तर प्रदेश आणि बिहारमधील असल्याचे सांगण्यात आले आहे. सक्सेना यांनी सांगितले की, ते कारखान्यासमोरील रिकाम्या जागेत झोपले होते, त्यामुळे स्फोटातून वाचले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न लांबी येथील रहिवासी जसपाल सिंह यांनी सांगितले की, हा कारखाना तरसेम सिंह या व्यक्तीचा आहे. सध्या तीन मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पोलीस आणि आपत्ती निवारण पथक घटनास्थळी स्फोटाची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधीक्षक डॉ. अखिल चौधरी, पोलिस अधीक्षक मनमीत सिंह, लांबीचे उप पोलिस अधीक्षक जसपाल सिंह आणि किलियानवली पोलिस स्टेशनच्या प्रभारी करमजीत कौर घटनास्थळी दाखल झाले. डॉ. चौधरी यांनी या दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असे स्पष्ट केले आहे.