सीना नदीत बुडून पाचवीतील विद्यार्थ्याचा मृत्यू; होनमुर्गीत हृदयद्रावक घटना
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील होनमुर्गी
परिसरात एका दुर्दैवी घटनेत पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सीना नदीत बुडून
मृत्यू झाला आहे. समर्थ कोळी (वय अंदाजे ११) असे मृत मुलाचे नाव असून या घटनेमुळे
परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर समर्थ आणि त्याचे
तीन मित्र शेळ्या चारण्यासाठी रानात गेले होते. दुपारच्या कडक उन्हामुळे शेळ्यांना
पाणी पाजण्यासाठी ते सीना नदीच्या पात्राजवळ गेले. नदी दुथडी भरून वाहत असल्याने
पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान होता. यावेळी पोहण्याच्या मोहापोटी तिघे मुले नदीत
उतरली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून जाऊ लागले. स्थानिक ग्रामस्थांनी
तत्काळ धाव घेत दोन मुलांना सुखरूप बाहेर काढले. परंतु समर्थला वाचवण्यात अपयश
आले. बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे होनमुर्गी
गावावर शोककळा पसरली असून पालकांनी पावसाळ्यात व पाण्याच्या ठिकाणी मुलांवर लक्ष
ठेवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.