कीर्तनकाराचा घृणास्पद प्रकार उघड; अल्पवयीन मुलीवर पाच वर्षे अत्याचार, गावकऱ्यांचा संताप
अहिल्यानगर : जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एका कथित कीर्तनकाराचा
धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
धार्मिकतेचा आव आणून समाजात वावरणाऱ्या या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर तब्बल पाच
वर्षे अत्याचार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरोपी यशवंत एकनाथ थोरात उर्फ
अण्णासाहेब गुंजाळ (वय ३८) याच्याविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
करण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
गावकऱ्यांचा तीव्र निषेध
मंगळवारी गावकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आरोपीच्या प्रतिमेला चपलेचा हार घालून प्रतीकात्मक दहन केले. तसेच गाव बंदची हाक देत या कृत्याचा तीव्र निषेध नोंदवला. सरपंच नंदा भागाजी गावडे यांनी गावकऱ्यांच्या भावना व्यक्त करत आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. कीर्तनाच्या माध्यमातून समाजात विश्वास मिळवलेल्या या व्यक्तीने त्याच विश्वासाचा गैरफायदा घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
वैयक्तिक आयुष्याबाबतही संशय
आरोपी हा सिन्नर तालुक्यातील रहिवासी असून त्याचे
वैयक्तिक आयुष्यही वादग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या दोन पत्नी
असून, त्यापैकी एक पत्नी त्याला सोडून गेल्याचे तर दुसरी सध्या गरोदर असल्याचे
सांगितले जात आहे. यापूर्वीही त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची चर्चा असून,
कीर्तनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याचा संशय
व्यक्त केला जात आहे. या संपत्तीच्या स्त्रोतांबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.
कारवाईची मागणी
या घटनेमुळे वारकरी परंपरा आणि धार्मिक क्षेत्रावर
प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी
केली असून पोलीस प्रशासनाकडून जलद आणि निष्पक्ष तपासाची अपेक्षा व्यक्त केली जात
आहे.
धर्माच्या नावाखाली लपलेली ही विकृती उघड झाल्याने समाज
हादरला असून, आता पीडितेला न्याय मिळतो का याकडे
सर्वांचे लक्ष लागले आहे.