एलपीजी पुरवठ्यावर ताण कायम; घाबरू नका पण वापर काटकसरीने करा – केंद्र सरकार

नवी दिल्ली : देशातील ऊर्जा परिस्थिती अद्याप चिंताजनक असली तरी एलपीजी पुरवठ्याबाबत नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत देशातील एलपीजी, पेट्रोल आणि नैसर्गिक गॅस पुरवठ्याबाबत माहिती दिली. त्या म्हणाल्या की मध्य पूर्व आशियातील परिस्थिती अद्याप पूर्णपणे स्थिर झालेली नाही. त्यामुळे ऊर्जा क्षेत्रात काही प्रमाणात तणाव आहे. तरीही देशातील एलपीजीचा साठा संपलेला नाही आणि घरगुती गॅस पुरवठा पूर्वीसारखाच सुरू राहणार आहे. नागरिकांनी मात्र एलपीजीचा वापर शक्य तितका काटकसरीने करावा आणि अन्न शिजवण्यासाठी पर्यायी इंधनाचाही विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला.

परिस्थिती अजूनही चिंतेची शर्मा म्हणाल्या, “एलपीजीच्या बाबतीत परिस्थिती पूर्णपणे सामान्य नाही. सध्या कोणत्याही पुरवठादाराचा साठा संपलेला नसला तरी काळजी घेणे आवश्यक आहे.” त्यांनी स्पष्ट केले की घरगुती वापरासाठी गॅस सिलिंडरचा पुरवठा नियमितपणे सुरू राहील. ऑनलाईन बुकिंगमध्ये वाढ गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये मोठी सुधारणा झाल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या देशात जवळपास ९४ टक्के गॅस सिलिंडर ऑनलाईन पद्धतीने बुक केले जात आहेत. तसेच डिलिव्हरी ऑथेंटिफिकेशन कोड प्रणालीतही सुधारणा झाली असून सुमारे ७६ टक्के ग्राहक या प्रणालीचा वापर करत आहेत. व्यावसायिक सिलिंडर पुरवठ्यात दिलासा व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरचे वितरण काही काळासाठी थांबवण्यात आले होते. मात्र आता ते टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केले जात आहे. बिहार, दिल्ली, गुजरात, हरियाणा, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मणिपूर, राजस्थान आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये व्यावसायिक एलपीजीचे वितरण सुरू करण्यात आले आहे. पर्यायी इंधनाचा वापर वाढवण्याचा सल्ला गॅस सिलिंडरचा साठा करून काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही शर्मा यांनी दिला. त्याचबरोबर काही क्षेत्रांसाठी केरोसीन आणि कोळसा यांसारखी पर्यायी इंधने वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. यामध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट क्षेत्राचाही समावेश आहे. या उपाययोजनांमुळे एलपीजीवरील ताण काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असल्याचे केंद्र सरकारने सांगितले आहे.