नातेपुते येथे तरुणाची निर्घृण हत्या; पत्नी आणि मेव्हण्याला २४ तासांत अटक
सोलापूर : जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे कौटुंबिक
वादातून एका ३५ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना
उघडकीस आली आहे. या प्रकरणात पत्नी आणि मेव्हण्याने मिळून कट रचून हत्या केल्याचे
समोर आले असून पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांच्या आत आरोपींना अटक केली आहे.
मयत विजय डोंग्या भोसले (वय ३५) हे नातेपुते येथील रहिवासी होते.
त्यांच्या पत्नी कांती भोसले आणि मेव्हणा रया उर्फ बिऱ्या काळे यांनी विजय
यांच्याकडे ‘बारामतीला राहायला चला’ असा तगादा लावला होता. याच कारणावरून १४ मार्च
रोजी रात्री अकराच्या सुमारास पर्वतेश्वर माळ परिसरात त्यांच्यात जोरदार वाद झाला.
दगड आणि सुरीने भीषण हल्ला वादाचे रूपांतर हाणामारीत झाले
आणि रागाच्या भरात मेव्हणा रया काळे याने विजय यांच्या डोक्यात दगड घातला.
त्याचवेळी पत्नी कांती हिने सुरीने त्यांच्या कानावर वार केले. त्यानंतर
लाथाबुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विजय
भोसले यांचा जागीच मृत्यू झाला.
पोलिसांचा रहिमतपूरपर्यंत पाठलाग घटनेची माहिती मिळताच
नातेपुते पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हा
नोंदवला. सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तातडीने
तपास सुरू केला. पोलिसांनी सर्वप्रथम मयताची पत्नी कांती भोसले हिला ताब्यात
घेतले. तर मुख्य आरोपी रया उर्फ बिऱ्या काळे हा फरार झाला होता. तांत्रिक तपास आणि
गोपनीय माहितीच्या आधारे तो सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे असल्याचे पोलिसांना
समजले. पोलिसांनी तेथे सापळा रचून मोठ्या शिताफीने त्याला अटक केली. गुन्हा
घडल्यापासून अवघ्या चोवीस तासांच्या आत आरोपीला पकडल्यामुळे पोलीस दलाचे सर्वत्र
कौतुक होत आहे.