काबूलमध्ये पाकिस्तानी हवाई हल्ल्याचा आरोप; रुग्णालय उद्ध्वस्त, शेकडो मृत
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथे झालेल्या हवाई
हल्ल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित व मालमत्तेची हानी झाल्याची माहिती समोर आली
आहे. अफगाण सरकारचे प्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी या घटनेची माहिती दिली. मिळालेल्या
माहितीनुसार, अमली पदार्थ व्यसनमुक्ती केंद्र म्हणून
कार्यरत असलेल्या एका रुग्णालयावर हा हल्ला करण्यात आला. या भीषण घटनेत आतापर्यंत
सुमारे चारशे जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले जात आहे. तसेच अंदाजे दोनशे
पन्नास जण गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यात रुग्णालयाचा मोठा भाग पूर्णपणे
उद्ध्वस्त झाला असून मृतांपैकी बहुतांश जण तेथे उपचार घेत असलेले रुग्ण असल्याची
माहिती आहे. बचाव पथके अद्यापही ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचे आणि इमारतीत
लागलेली आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत.
पाकिस्तानचे स्पष्टीकरण दरम्यान, पाकिस्तानने रुग्णालयावर हल्ला केल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.
पाकिस्तानी पंतप्रधानांच्या कार्यालयातील प्रवक्ते आणि माहिती विभागाने दिलेल्या
माहितीनुसार, हवाई कारवाईमध्ये केवळ दहशतवादी गटांचे तळ आणि
त्यांच्या शस्त्रसाठ्याला लक्ष्य करण्यात आले होते. पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार,
नागरिकांची जीवितहानी टाळण्यासाठी ही कारवाई अत्यंत सावधगिरीने
करण्यात आली होती. अफगाण सरकारचे आरोप खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचा दावा
पाकिस्तानने केला आहे. वाढता सीमा तणाव या हवाई हल्ल्याच्या काही तास आधी दोन्ही
देशांच्या सीमेजवळ जोरदार गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमधून डागलेले
मोर्टारचे गोळे खोस्त प्रांतातील गावांवर आदळले, ज्यामध्ये
दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला.
याउलट पाकिस्तानचा दावा आहे की, अफगाणिस्तानच्या बाजूने डागलेल्या गोळ्यामुळे बाजोर जिल्ह्यात एका
कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला. संयुक्त राष्ट्रांची चिंता या वाढत्या
तणावाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडूनही चिंता व्यक्त
करण्यात आली आहे. परिषदेकडून अफगाणिस्तानातील तालिबान प्रशासनाला दहशतवादाविरोधात
कठोर कारवाई करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पाकिस्तानने वारंवार आरोप केला आहे
की, काही दहशतवादी गट हल्ल्यांसाठी अफगाण भूमीचा वापर करत
आहेत. मात्र काबूल प्रशासनाने हे आरोप सातत्याने नाकारले आहेत. दोन्ही देशांमधील
वाढता संघर्ष संपूर्ण प्रदेशाच्या स्थिरतेसाठी धोकादायक ठरत असल्याची चिंता व्यक्त
केली जात आहे.