नाशिकमध्ये प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉक्टरांची आत्महत्या; घरात गळफास घेत जीवन संपवले
नाशिक : शहरात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत
असताना गंगापूर रोड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डी. के. नगर भागात
राहणाऱ्या प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ञ डॉ. मनिषा निलेश जेजुरकर (वय ४०) यांनी
राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती समोर आली आहे.
डॉ. मनिषा जेजुरकर या जिल्हा शासकीय रुग्णालयातील
मनोविकार तज्ञ डॉ.निलेश जेजुरकर यांच्या
पत्नी होत्या. त्यांच्या आत्महत्येच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात
आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मनिषा जेजुरकर या गंगापूर रोडवरील
‘रेवती ब्ल्यू अपार्टमेंट’, डी. के. नगर येथे वास्तव्यास
होत्या. शुक्रवारी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी राहत्या घरातील
खिडकीच्या लोखंडी रॉडला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. घटनेची माहिती
मिळाल्यानंतर त्यांना बेशुद्ध अवस्थेत दुपारी सुमारे २.४० वाजता उपचारासाठी जिल्हा
रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत
घोषित केले. या प्रकरणी पोलीस स्टेशन येथे
अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट
झालेले नसून पोलिस अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.