आई-वडिलांनी घरकामावरून रागावल्याचा मनावर घेतला; २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या

बीड : जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे २१ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. विराज हरिदास भागत असे मृत तरुणाचे नाव असून तो आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, विराज भगत हा काही दिवसांपासून घरच्या कामांकडे दुर्लक्ष करत होता. यावरून त्याचे आई-वडील त्याच्यावर नाराज होते. मंगळवारी सकाळी ‘घरच्या कामात मदत का करत नाहीस?’ असे विचारत पालकांनी त्याला रागावले होते. पालकांचे बोलणे मनाला लागल्याने विराज नाराज झाला. घरच्यांनी सर्वांसमोर रागावल्याची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. याच मानसिक अवस्थेत तो सकाळी सुमारे ११ वाजता घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडला. यानंतर तो गावातील काळशेत शिवारातील सर्व्हे क्रमांक ११९ मधील स्वतःच्या शेतात गेला आणि तेथे आंब्याच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

बहिणीने पाहिला धक्कादायक प्रकार

विराज बराच वेळ घरी न परतल्याने आणि तो शेताकडे गेला असावा असा अंदाज आल्याने त्याची बहीण त्याला शोधण्यासाठी शेतात गेली. तेथे तिला विराज झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसला. हे दृश्य पाहून तिने आरडाओरडा केला. त्यानंतर परिसरातील लोक आणि कुटुंबीय तात्काळ शेतात पोहोचले. त्यांनी विराजला खाली उतरवून उपचारासाठी कडा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.  एका तरुण मुलाचा असा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.