आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची अवंती नगर-गणेशनगर नाला कामाची पाहणी
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज अवंती नगर आणि गणेशनगर परिसराला भेट देत सुरू असलेल्या नाल्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. अवंती नगर ते गणेशनगर या दरम्यान नाल्याचे रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम सध्या सुरू असून त्याचा सविस्तर आढावा आयुक्तांनी घेतला. या वेळी आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना काम नियोजित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी कामात कोणतीही ढिलाई न ठेवता ते दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच नाल्याची वहन क्षमता वाढवून परिसरात पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने काम प्रभावीपणे राबविण्याचेही त्यांनी सांगितले. या पाहणीदरम्यान अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, नगर अभियंता सारिका आकूलवार, विभागीय अधिकारी सुनीता हिबारे, श्याम कन्न तसेच संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.