यात्रेच्या दिवशी १६ वर्षीय पैलवान मुलाची आत्महत्या; उळे कासेगावात खळबळ
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळे कासेगाव
येथे एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली
आहे. हरिदास अशोक मोरे असे मृत मुलाचे नाव असून तो इयत्ता नववीत शिक्षण घेत होता. रविवारी
सकाळी ही घटना उघडकीस आली. हरिदास हा गावातील तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेत होता
आणि भविष्यात पैलवान होण्याचे त्याचे स्वप्न होते. मिळालेल्या माहितीनुसार,
गावात यात्रा असल्यामुळे हरिदासला त्यात सहभागी व्हायचे होते. मात्र,
उन्हाळ्यामुळे पिकांना पाणी देणे आवश्यक असल्याने वडिलांनी त्याला
शेतात जाण्यास सांगितले. यावरून तो नाराज झाला होता.
वडिलांच्या सांगण्यावरून तो शेतात गेला, मात्र काही वेळाने त्याच्या भावाने जाऊन पाहिले असता तो पत्र्याच्या
शेडमध्ये लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला तत्काळ खाली
उतरवून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु
डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद पोलिसांकडे करण्यात आली असून
पुढील तपास सुरू आहे. हरिदासच्या निधनामुळे गावात शोककळा पसरली आहे.