१९ एप्रिलला भीम जयंती मिरवणूक पारंपरिक मार्गावरच; भीमसैनिकांचा निर्धार

सोलापूर : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात येणारी भीम जयंती मिरवणूक यंदाही पारंपरिक मार्गावरूनच काढण्यात येणार असल्याचा निर्धार भीमसैनिकांनी व्यक्त केला आहे. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी ही माहिती दिली. रविवार, १९ एप्रिल रोजी ही भव्य मिरवणूक पार पडणार आहे. न्यू बुधवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानात आयोजित आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत बाळासाहेब वाघमारे, दशरथ कसबे, रॉकी बंगाळे, पप्पू गायकवाड, नागेश इंगळे, अजित बनसोडे, सुजाता उघडे, नितीन शिवशरण यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मिरवणुकीचे नियोजन, शिस्तबद्ध आयोजन आणि पारंपरिक मार्ग कायम ठेवण्यावर भर देण्यात आला.