महासाधना सप्ताहांतर्गत ‘कर्मयोगी’ प्रशिक्षण अनिवार्य; अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांचे निर्देश
सोलापूर : राज्य शासनाच्या ‘महासाधना सप्ताह’
उपक्रमांतर्गत सोलापूर महानगरपालिकेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘कर्मयोगी’
प्रशिक्षण पूर्ण करावे, असे निर्देश अतिरिक्त आयुक्त वीणा
पवार यांनी दिले आहेत. भारत सरकार क्षमता विकास आयोग आणि कर्मयोगी भारत यांच्या
संयुक्त विद्यमाने २ ते ८ एप्रिल दरम्यान ‘साधना सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या
अंतर्गत अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘iGOT कर्मयोगी’ या
प्लॅटफॉर्मवर किमान चार तासांचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षण
कार्यक्रमाची सुरुवात २ एप्रिल रोजी इंद्रभुवन इमारतीतील सभागृहात आयोजित
कार्यशाळेद्वारे करण्यात आली. यावेळी उपायुक्त सोनाली यादव, सहायक
आयुक्त मनीषा मगर, गिरीश पंडित यांच्यासह विभागप्रमुख,
अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संगणक विभाग प्रमुख स्नेहल
चपळगावकर यांनी ‘महासाधना सप्ताह’ आणि iGOT प्रणालीची नोंदणी
व अभ्यासक्रमाबाबत सविस्तर तांत्रिक मार्गदर्शन केले. या उपक्रमाचा उद्देश शासकीय
कर्मचाऱ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाशी सुसंगत बनवणे, प्रशासन
अधिक गतिमान व पारदर्शक करणे आणि नागरिकांना दर्जेदार सेवा देणे हा आहे. डिजिटल
तंत्रज्ञान, ई-गव्हर्नन्स, संवाद
कौशल्य आणि कार्यक्षमता वाढविण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. अधिकारी व
कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेऊन निर्धारित कालावधीत प्रशिक्षण पूर्ण
करावे, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी केले.