लिंगायत समाजासाठी महत्त्वपूर्ण निर्णय; महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार
सोलापूर : लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची जागा
उपलब्ध करून देणे तसेच श्री महात्मा बसवेश्वर पुतळ्यासाठी ५० लाख रुपये आणि
लिंगायत भवनासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल महापौर विनायक कोंड्याल यांचा
सत्कार करण्यात आला. शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना, बेडा
बुडगा जंगम समाज आणि प्रहार संघटना यांच्या वतीने सातलिंग स्वामी यांच्या
निवासस्थानी हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मंत्री बच्चू
कडू यांचे स्वीय सहाय्यक सातलिंग स्वामी यांच्या हस्ते महापौरांचा गौरव करण्यात
आला. तसेच शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, सभागृह नेते नरेंद्र
काळे, नगरसेविका वनिता पाटील व अश्विनी चव्हाण, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावंकर यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला
बसवेश्वर स्मारक समितीचे पदाधिकारी, जंगम समाजाचे प्रतिनिधी
तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या मनोगतात महापौर कोंड्याल यांनी सांगितले की, “महात्मा बसवेश्वर यांनी दिलेली समता व समाजहिताची शिकवण आमच्या कार्याचा
आधार आहे. लिंगायत समाजासाठी स्मशानभूमीची सुविधा ही त्यांच्या भावनांचा सन्मान
आहे. मंजूर निधीतून बसवेश्वर पुतळा व लिंगायत भवन उभारणी करून भावी पिढ्यांसाठी
प्रेरणास्थान निर्माण केले जाईल.” या निर्णयाचे स्वागत करत उपस्थितांनी महापौरांचे
आभार मानले आणि हा लिंगायत समाजासाठी ऐतिहासिक टप्पा असल्याचे मत व्यक्त केले.
कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.