शिवजन्मोत्सव ट्रस्टतर्फे रक्तदान शिबिर; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्री शिवजन्मोत्सव (मध्यवर्ती) महामंडळ ट्रस्टच्या वतीने तसेच छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय रक्तपेढी यांच्या सहकार्याने डाळींबी आड शिंदे चौक येथे अभिवादन कार्यक्रमासह भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौरांच्या हस्ते रक्तदात्यांचा सन्मानही करण्यात आला. आपल्या मनोगतात महापौर कोंड्याल यांनी उन्हाळ्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याचे सांगत, अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. “या सामाजिक कार्यामुळे अनेकांना जीवनदान मिळते,” असे नमूद करत त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाला सभागृह नेते नरेंद्र काळे, ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर नाना काळे, माजी आमदार रविकांत पाटील, नगरसेवक मनीष केत यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.