नातेपुतेजवळ भीषण अपघात; कालव्यात कार कोसळून तिघांचा मृत्यू
नातेपुते : नातेपुते परिसरातील शेरे पुलाजवळ निरा उजव्या कालव्यात
कार कोसळून झालेल्या भीषण अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एकजण
थोडक्यात बचावला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ईर्टिगा कारने प्रवास करत असताना
चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार थेट कालव्यात कोसळली. कालव्यातील
पाण्याचा प्रवाह प्रचंड असल्याने वाहन काही क्षणातच पूर्णपणे पाण्याखाली गेले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ
घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर एका प्रवाशाला
वाचवण्यात यश आले, तर उर्वरित तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिस व आपत्कालीन पथक घटनास्थळी
दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे व पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. अपघाताचे
नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.