अमेरिका-इराण तणाव वाढला; ४५ दिवसांच्या युद्धविरामासाठी गुप्त चर्चा सुरू
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव दिवसेंदिवस वाढत असताना
४५ दिवसांच्या युद्धविरामासाठी गुप्त चर्चांना सुरुवात झाल्याची माहिती समोर आली
आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी दिलेल्या
अल्टिमेटमनंतर परिस्थिती अधिकच चिघळली होती. मात्र, युद्ध टाळण्यासाठी पडद्यामागे राजनयिक
हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे. 'Axios'च्या वृत्तानुसार,
पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्की हे देश मध्यस्थी
करत आहेत. अमेरिकेचे दूत स्टीव विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची
यांच्यात गुप्त संदेशांची देवाणघेवाण सुरू असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, ट्रम्प यांनी इराणला दिलेली डेडलाईन २४
तासांनी वाढवली आहे. ‘ट्रुथ सोशल’वरील पोस्टमध्ये त्यांनी मंगळवारी रात्रीपर्यंतची
मुदत दिली असून, होर्मुज सामुद्रधुनी खुली न केल्यास गंभीर
परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशाराही दिला आहे. यावर
प्रतिक्रिया देताना इराणच्या संसद अध्यक्षांनी युद्धातून काहीही साध्य होणार नाही,
असे स्पष्ट करत “इराणच्या अधिकारांचा सन्मान करा आणि हा धोकादायक
खेळ थांबवा,” असे आवाहन केले आहे. सध्या सुरू असलेल्या या
हालचालींना ‘युद्ध टाळण्याचा अंतिम प्रयत्न’ मानले जात असून, पुढील काही दिवसांत परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे.