मंगळवेढ्यात १४ वर्षीय मुलीचा मृत्यू; बालविवाहानंतर छळामुळे टोकाचा निर्णय

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा बालविवाहानंतर केवळ चार महिन्यांत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावची व निंबोणी परिसरातील या मुलीचा काही महिन्यांपूर्वी बालविवाह लावून देण्यात आला होता. मात्र, लग्नानंतर सासरी तिचा मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचा आरोप आहे. या छळाला कंटाळून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त होत असून, बालविवाहासारख्या बेकायदेशीर प्रथांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ज्या वयात शिक्षण व भविष्य घडवण्याची वेळ असते, त्या वयात मुलीवर संसाराचे ओझे टाकल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याची चर्चा आहे. प्रकरणाची गंभीर दखल घेत मंगळवेढा पोलीस यांनी कारवाई करत पती व सासऱ्याला अटक केली आहे. तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे करत आहेत. या घटनेमुळे प्रशासनाच्या सतर्कतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. कठोर कायदे असतानाही बालविवाह कसा झाला, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.