३०० रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापिका रंगेहाथ; माजी विद्यार्थ्याच्या तक्रारीवर एसीबीची कारवाई

छत्रपती संभाजीनगर : प्रवेश निर्गम उतारा देण्यासाठी ३०० रुपयांची लाच स्वीकारताना होली क्रॉस मराठी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका मारिया जोस एस्तीबेरो यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) ने रंगेहाथ पकडले. गुरुवारी ही कारवाई करण्यात आली असून, या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ४८ वर्षीय वकील असून त्यांनी संबंधित शाळेत पूर्वी शिक्षण घेतले आहे. निवडणूक आयोगाच्या विशेष पडताळणी मोहिमेसाठी त्यांना प्रवेश उताऱ्याची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी शाळेत संपर्क साधला असता, मुख्याध्यापिकेने सुरुवातीला ५०० रुपयांची मागणी केली. तक्रारदाराने याबाबत Anti Corruption Bureau कडे तक्रार नोंदवली. ८ एप्रिल रोजी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एसीबीने ९ एप्रिल रोजी सापळा रचला. तक्रारदाराने ३०० रुपये मुख्याध्यापिकेला दिल्यानंतर ठरलेल्या इशाऱ्यानुसार पथकाने कारवाई करत त्यांना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक माधुरी केदार-कांगणे, उपअधीक्षक राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक चैनसिंग गुसिंगे, तपास अधिकारी वाल्मीक कोरे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पुढील तपास सुरू आहे.